9 वी.गोलीय आरशाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमा .🎷
प्रकाशाचे परावर्तन या भागात आज आपण गोलीय आरशाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमा पाहू.
किरणाकृती काढण्यासाठी प्रकाश परावर्तनाच्या नियमावर आधारित तीन नियम आपण पाहिलेत. या तीन किरणा पैकी दोन किरण वापरून आपण किरणाकृत काढू शकतो.
अंतर्गोल म्हणजेच अंतर्वक्र आरशासमोर विविध अंतरावर पदार्थ ठेवला असता त्याच्या प्रतिमा या वेगवेगळ्या ठिकाणी मिळतात , ते कसे आज पाहू.
1. वस्तू म्हणजेच पदार्थाचे स्थान :- अनंत अंतरावर ( वक्रता केंद्र पासून खूप दूर )
जेव्हा अंतर्गोल आरशासमोर वस्तू ही अनंत अंतरावर म्हणजेच वक्रता केंद्रापासून खूप दूर अंतरावर असते तेव्हा वस्तूची प्रतिमा ही मुख्य नाभीवर मिळते, त्यावेळेस प्रतिमेचे स्वरूप हे वास्तव व उलटी प्रतिमा अशी असते आणि प्रतिमेचा आकार हा बिंदू रूप असतो.
2. अंतर्गोल आरशासमोर वस्तूचे स्थान :- वक्रता केंद्राच्या पलीकडे
अंतर्गोल आरशासमोर जेव्हा वस्तू वक्रता केंद्राच्या C पलीकडे असते तेव्हा त्या वस्तूची प्रतिमा ही वक्रता केंद्र आणि नाभी F यामध्ये तयार होते प्रतिमेचे स्वरूप हे वास्तव व उलट असते. प्रतिमेचा आकार हा वस्तूपेक्षा लहान असतो.
3. वस्तूचे स्थान :- वक्रता केंद्रावर C
अंतर्गोल आरशासमोर वस्तू जेव्हा वक्रता केंद्रावर C असते तेव्हा प्रतिमेचे स्थान वक्रता केंद्रावरच असते पण प्रतिमा ही उलट असते, त्यासोबत प्रतिमा ही वास्तव असून प्रतिमेचा आकार मूळ वस्तू एवढाच असतो.
4. पदार्थाचे स्थान वक्रता केंद्र C आणि नाभी F यांच्यामध्ये
अंतर्गोल आरशा समोर वस्तू जेव्हा वक्रता केंद्र आणि नाभी यांच्या मध्ये असते तेव्हा प्रतिमेचे स्थान वक्रता केंद्राच्या पलीकडे असते . प्रतिमेचे स्वरूप हे वास्तव व उलट असते . प्रतिमेचा आकार हा वस्तूपेक्षा मोठा असतो.
5. वस्तूचे स्थान :- नाभीवर
अंतर्गोल आरशासमोर वस्तू जेव्हा नाभीवर असते तेव्हा प्रतिमेचे स्थान हे अनंत अंतरावर असून प्रतिमा ही उलट व वास्तव असते , पण प्रतिमेचा आकार हा एवढा मोठा असतो की ती पडद्यावर घेता येत नाही.
6. वस्तूचे स्थान ध्रुव P आणि नाभी F यामध्ये :-
अंतर्गोल आरशासमोर वस्तू जेव्हा ध्रुव आणि नाभी यामध्ये असते तेव्हा प्रतिमा ही आरशाच्या मागे तयार झाल्यामुळे ती आभासी असते त्यामुळे ती पडद्यावर घेता येत नाही , प्रतिमेचे स्वरूप हे सुलट असून , प्रतिमेचा आकार वस्तु पेक्षा मोठा असतो.
₹ . Hint / युक्ती / क्लृप्ती
सोप्या पद्धतीने लक्षात ठेवण्यासाठी काही उपयुक्त टिप्स 🎷
किरण आकृती काढताना पेन्सिल ला टोक असावे जेणेकरून एकच सरळ रेष आखता येईल. एकावर एक रेष नसावी , खाडाखोड नसावे, खोड रबर चा वापर केलेला नसाव म्हणजेच आकृती ही सुस्पष्ट असावी.
अनंत अंतराकडून आरशाकडे जाताना पदार्थाचा आकार हा लहान करावा कारण प्रतिमेचा आकार हा वाढत जातो.
अंतर्गोल आरशासमोर पदार्थ ठेवल्यावर त्यांच्या ज्या प्रतिमा तयार होतात त्यांचा अभ्यास सुलभ रीतीने करण्यासाठी पुढील आकृती उपयुक्त ठरेल.
एकाच वेळेस सहा प्रतिमांचा अभ्यास आपणास करता येतो. पदार्थ जसा जसा आरशाकडे सरकतो तसे प्रतिमा ही आरशापासून दूर जाते. पण याला अपवाद सहावी आकृती आहे.
स्वतः आकृत्या काढूनच अभ्यास करावा. पट्टी, पेन्सिलचा योग्य वापर करावा. मुख्य नाभी व वक्रता केंद्र ही अंतरे मोजूनच घ्यावीत . आभासी प्रतिमा ही ठिपके असलेली रेषा काढावी. रेषा या पट्टीच्या साह्यानेच काढाव्यात. आपण काढलेल्या आकृतीत काय चूक आहे ते आपणास बऱ्याच वेळेस समजत नसते त्यामुळे काढलेली आकृती शिक्षकांना दाखवावी.🎷