गोष्ट सागरची, आपल्या सगळ्यांची 🎷

गोष्ट सागरची, आपल्या सगळ्यांची 🎷

 

एका लहानशा गावात सागर नावाचा एक मुलगा राहत असतो. लहानपणीच त्याचे आई-वडील वारल्यामुळे तो अनाथ असतो. गावकऱ्यांनी त्याचे पालन पोषण करून मोठे केलेले असते. कमावत्या वयाचा झाल्यावर, तो काहीतरी काम करून जगत असतो.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सकाळी चपात्या करून ठेवल्यावर रात्रीसाठी तो दोन चपात्या ठेवत असतो. परंतु बऱ्याच वेळेस त्या दोन चपात्या त्या घरातील उंदरं पळवून नेत असत. त्याचसोबत घरातील कपड्यांची पण नासधूस उंदरामुळे होत असे. कष्ट करूनही त्याला व्यवस्थित मोबदला न मिळाल्यामुळे व घरातील उंदरामुळे तो वैतागतो. एखाद्या महात्म्याला भेटून आपल्याबद्दल काहीतरी चांगले विचारावे असे त्याच्या मनात येते. विचारपूस करताना असे त्याला समजते की पूर्व दिशेला गेल्यास एक महात्मा आहेत, जे सर्व प्रश्नांची उत्तरं छान पद्धतीने देतात. एके दिवशी तो त्या महात्म्याच्या शोधात पूर्व दिशेला पायी चालायला सुरुवात करतो. भरपूर चालून झालेले असते संध्याकाळ व्हायची वेळ असते, आता रात्री कुठेतरी निवारा पहावा म्हणून तो पुन्हा झपझप चालू लागतो. दूर त्याला एक राजवाडा पद्धतीचे घर दिसते. रात्री पुरता निवारा व्यवस्था होईल या आशेने तो पुन्हा जलद चालायला सुरुवात करतो. पण दरवाज्यावर दोन नोकर असतात ते त्याला आत जाऊ देत नाहीत. तो विनंती करत असतो, परंतु नोकर त्याला आत सोडत नसतात. हा गोंधळ ऐकुन घराची मालकीण बाहेर येते. तो युवक म्हणजे सागर त्या स्त्रीला प्रणाम करतो व सांगतो की, मी या या हेतूने घराच्या बाहेर पडलो आहे, आज रात्री पुरता निवारा जर मला मिळाला तर मी तुमचे उपकार जन्मभर लक्षात ठेवीन. ती स्त्री त्याला आत घेऊन येते, जेवण झाल्यावर ती स्त्री त्याला सांगू लागते की मी एक विधवा स्त्री आहे, मला एक तरुण मुलगी आहे, तिच्या लग्नाची चिंता मला त्रस्त करते, त्यामुळे रात्री झोपही व्यवस्थित येत नाही, तुम्ही जातच आहात तर त्या महात्म्याला माझ्या मुलीच्या लग्नाबद्दल विचारलं तर मीही तुमचे उपकार जन्मभर विसरणार नाही. सागर मनात विचार करतो जातच आहे तर यांचाही प्रश्न विचारू, असे म्हणून तो त्या स्त्रीला होकार देतो. सकाळी तो पुन्हा आपल्या मार्गाला जातो. प्रवासाला निघण्यापूर्वी ती स्त्री त्या युवकाला खाण्यापिण्याचे सामान बांधून देते. 

 बरेच अंतर चालून गेल्यावर त्याला तहान लागलेली असल्यामुळे तो पाण्याचा शोध घेत असतो. थोड्या अंतरावर त्याला नदीच्या वाहण्याचा आवाज येतो. नदीचे थंडगार पाणी पिऊन तो तृप्त होऊन बसतो. तेवढ्यात एक कासव त्याच्याजवळ येते. ते भले मोठे कासव असते. ते कासव त्याला बोलू लागते, त्याला आश्चर्य वाटते. मग दोघे बोलू लागतात. सागर त्याच्या जीवनाला कसा वैतागला आहे हे सांगतो व महात्म्याच्या शोधात पूर्व दिशेला जात आहे असे सांगतो. कासवाला कुठेतरी बरे वाटते. कासव म्हणते मी पण माझ्या पाठीवरील ओझ्याला खूप वैतागलो आहे. त्या महात्म्याला माझ्या पाठीवरील ओझ्याबद्दल विचारलास तर मी तुझे उपकार जन्मभर विसरणार नाही. कारण या ओझ्या मुळे मला व्यवस्थित चालता पण येत नाही. सागर मनात विचार करतो, जातच आहे तर याचा ही प्रश्न त्या महात्म्याला विचारू. सागर कासवाला म्हणतो, “मी तुझा प्रश्न विचारतो” असे म्हणून तो पुन्हा मार्गस्थ होतो. 

खूप चालल्यावर आता मात्र सागरची परीक्षा सुरू झाली असे त्याला वाटते. कारण समोरचा रस्ता हा दरी व डोंगर यांनी युक्त त्याला दिसत असतो . दोन डोंगर चढून उतरल्यावर तो थकतो. त्याला मार्ग कठीण वाटत असतो. काय करावे, कसे जावे या विचारात तो थोड्यावेळ स्तब्ध बसतो. तर पुढच्या टेकडीवर त्याला एक साधू महाराज ध्यानस्थ बसले आहेत असे त्याला दिसते. त्याला वाटते हेच ते महात्मा, जे आपल्या प्रश्नांची उत्तर देतील. तो पुन्हा जलद त्या साधू महाराजांच्या दिशेने निघतो. पण थोड्याच वेळात थकल्यावर तो पुन्हा खाली बसतो. काही कारणाने ते साधू महाराज डोळे उघडतात, तर त्यांना सागर दिसतो. जादूच्या छडीने ते सागरला स्वतःजवळ आणतात. सागर त्यांच्या पाया पडतो. साधु महाराज विचारतात या दिशेला आजपर्यंत फार कमी जण आलेले आहेत, तू कसा काय आलास? सागर त्याची जीवन कथा सांगतो, माझ्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी मी आपणापर्यंत आलो आहे असे म्हणतो. ते साधू महाराज म्हणतात अरेरे!! तुझ्या प्रश्नाचे उत्तर देणारा महात्मा मी नाही. पण जातच आहेस तर माझ्याही प्रश्नाचे उत्तर त्यांना विचार “बरेच वर्षे झाले मी या ठिकाणी तपश्चर्या करत आहे पण मला मुक्ती काही मिळत नाही”. मला मुक्ती कधी मिळेल हे त्यांना विचार. सागर मनात विचार करतो, वाटले होते हेच ते साधू महाराज असतील, पण यांनी मलाच प्रश्न विचारायला सांगितले आहे. असो. काय हरकत आहे यांचा पण प्रश्न आपण त्या महात्म्याला विचारू. त्या साधू महाराजांना प्रणाम करून तो पुन्हा मार्गस्थ होतो. 

काही दिवस खूप अंतर चालून गेल्यावर त्याला ते महात्मा भेटतात. त्याचा आनंद गगनात मावत नसतो. आज आपण आपली जीवनकथा, व्यथा यांना सांगून या दुःखातून बाहेर पडण्याचा मार्ग विचारून घेऊ असे तो मनात म्हणतो. महात्म्याला भेटण्याची वेळ जवळ येते. महात्मा डोळे उघडतात, सागर कडे पाहतात, सागरला असे वाटते की हे तेज, हे नेत्र आपण आयुष्यभर विसरणार नाहीत. ते महात्मा म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून “गौतम बुद्ध असतात. धीर-गंभीर आवाजात ते महात्मा सागरला विचारतात, कोणत्या प्रयोजनाने आपण येथे आला आहात. सागर म्हणतो मला काही प्रश्न विचारायचे आहेत. महात्मा म्हणतात तुला केवळ तीन प्रश्न विचारण्याची मुभा देतो, त्यानंतर मी पुन्हा ध्यानस्थ होईल. सागर मनात विचार करतो रस्त्यात भेटलेली पहिली स्त्री जिने मला एका रात्रीसाठी आसरा दिला, ते भले मोठे कासव ज्याला व्यवस्थित चालताही येत नाही, आणि कितीतरी वर्ष झाले तपश्चर्या करणारे ते साधू महाराज त्यांना मुक्ती मिळत नाही, या तिघांच्या पुढे आपले दुःख खूपच छोटेसे आहे. आपलाच प्रश्न विचारून या तिघांपैकी एकाचा प्रश्न न विचारणे म्हणजे आपण स्वार्थी ठरवू, असे त्याला वाटते. 

तो हात जोडून पहिला प्रश्न विचारतो, “महाराज रस्त्यात मला एक साधू महाराज भेटले, त्यांना मुक्ती मिळत नाही. बरेच वर्षे झाले, ते तपश्चर्या करत आहेत, पण त्यांना मुक्ती काही मिळत नाही. ते महात्मा डोळे बंद करतात ध्यान मग्न होतात व सागरला सांगतात त्यांच्या जवळील जादूची छडी जर त्यांनी टाकून दिली तर त्यांना मुक्ती काही दिवसातच मिळेल. सागरला बरे वाटते तो दुसरा प्रश्न विचारतो.

 हे महात्मा रस्त्यात मला एक भला मोठा कासव भेटला, त्याला त्याच्या पाठीवरील ओझ्यामुळे चालता येत नाही. महात्मा पुन्हा डोळे बंद करतात, सागरला सांगतात की त्याच्या कवचा खाली बरेचसे मोती जमा झाले आहेत, त्या ओझ्याने त्याला चालता येत नाही. त्यांनी ते मोती टाकून दिले तर त्याचे जीवन सुसह्य होईल.

 सागर प्रणाम करून तिसरा प्रश्न विचारतो, महात्मा रस्त्यात मला एक विधवा स्त्री भेटली, तिच्या मुलीच्या लग्नासाठी ती स्त्री चिंतित होती. महात्मा पुन्हा डोळे बंद करतात आता या वेळेस त्यांच्या चेहऱ्यावर स्मित उमटते ते हळूच डोळे उघडून सागर कडे पाहतात व म्हणतात त्या स्त्रीला सांग तुझ्या चिंतेचे उत्तर तुझ्या समोरच आहे. एवढे बोलून महात्मा गौतम बुद्ध पुन्हा ध्यान मग्न होतात. सागर त्यांना प्रणाम करून आपल्या मार्गाला लागतो. बरेच अंतर चालून गेल्यावर त्याला साधू महाराज उंच टेकडीवर दिसतात. यावेळेस तो चालण्याचे कष्ट टाळतो, त्याऐवजी आरोळी/ हाक मारून त्या साधू महाराजांना आवाज देतो. साधु महाराज जादूच्या छडीने त्याला आपल्या जवळ घेतात.सागर ला पाहून साधू महाराजांना आनंद होतो. ते लगेच म्हणतात विचारलास का माझा प्रश्न. सागर आनंदाने म्हणतो हो विचारलं, त्यांनी सांगितले आहे की तुम्ही तुमच्या जवळील ही जादूची छडी टाकून दिलीत तर तुम्हाला मुक्ती लगेच मिळेल. ते साधू महाराज आपल्या जवळील छडी लगेच सागरला देतात व ध्यानमग्न होतात. काही दिवसातच त्यांना मुक्ती मिळते. जादूची छडी मिळाल्यामुळे सागर जादूनेच त्या कासवाच्या जवळ जातो. कासवाला आनंद होतो तो म्हणतो “विचारला का माझा प्रश्न”. सागर म्हणतो, हो विचारला, त्यांनी सांगितले की “तू तुझ्या पाठी खालील मोती काढून टाकले तर तुझे ओझे हलके होईल व तुला तुझे छान आयुष्य जगता येईल”. कासव सागरला म्हणतो तूच मदत करना. सागर कासवाच्या पाठी खाली मोती काढतो. सागर ने त्याच्या आयुष्यात एवढे छान मोती पाहिलेले नसतात. मोत्याचे ओझे कमी झाल्यावर कासव आता सहज हालचाल करू शकत असतो‌. कासव सागरला धन्यवाद म्हणतो व सर्व मोती सागरला देतो. सागर ते सर्व मोती व्यवस्थित बांधून घेतो व जादूच्या छडीच्या मदतीने त्या स्त्रीच्या घरा जवळ येतो. बऱ्याच दिवसांनी सागर आलेला पाहून त्या स्त्रीला आनंद होतो. ती स्त्री सागरला म्हणते काय, कसा झाला प्रवास? सागर त्या स्त्रीला सर्व प्रवासाचे वर्णन करतो. त्यास जादूची छडी व मोती मिळाले हे तो त्या स्त्रीला दाखवतो. हे पाहून त्या स्त्रीला आनंद होतो व ती म्हणते माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले का? सागर म्हणतो “महात्मा एवढेच म्हणाले, की तुझ्या प्रश्नाचे उत्तर तुझ्या समोरच आहे, असे सांग.”प्रथम त्या स्त्रीला काहीही समजत नाही पण लगेच तिला जाणवते की हाच तो मुलगा ज्याच्याशी आपण आपल्या मुलीचे लग्न लावून देऊ शकतो. आता सागर जवळ जादूची छडी व अनमोल असे मोती पण आहेत, हा कष्टाळू असून प्रामाणिक पण आहे. आपल्या मुलीस योग्य असा वर हाच.

गंमत अशी की ज्या प्रश्नाच्या उत्तरासाठी सागरने एवढा प्रवास केला होता तो प्रश्न न विचारताच त्याला उत्तरासह कर्मफळही मिळाले होते.

@ आज बर्याच जणांची अवस्था सागर सारखी आहे.

 काय आज आपल्याकडे जादूची छडी आहे का सागर सारखी?

आपली अवस्था त्या साधू महाराजाप्रमाणे आहे, जे आपल्याजवळ आहे त्यातच आपण गुरफटून असतोत. मी असा आहे, तसा आहे, मी युंव करेन त्यूं करेन. या दिवा स्वप्नातच आपल्या आयुष्य गेल्यामुळे आपण प्रगती पासून वंचित राहतोत.

आपली अवस्था त्या स्त्री प्रमाणे आहे, आपल्या प्रश्नांची उत्तरे आपल्या आजूबाजूला, आपल्या समोरच असतानाही ते आपल्याला समजत नसते.

 बऱ्याच जणांना वाटेल अशी कुठे जादूची छडी असते का. खरे ती जादूची छडीच आहे आपल्या घरामध्ये मिक्सर, टीव्ही, वॉशिंग मशीन, फ्रीज, बाईक, कार यासारखी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आहेत, जादूच्या छडी पेक्षा हे काय कमी आहेत का? बऱ्याच गोष्टी आपल्याजवळ असतानाही आपण ज्या गोष्टी नाहीत त्या मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतोत.

 या कथेतील कासवाप्रमाणे नको ते ओझे आपण आपल्या पाठीवर घेऊन फिरत असतोत.

आशा आहे की, आपले जीवनही सागरच्या जीवना प्रमाणे सुरळीत होईल. 

ज्याप्रमाणे सागरला गौतम बुद्ध भेटले व त्याच्या सर्व समस्यांचे निराकरण झाले तसेच आपल्याबद्दलही घडो. बुद्ध म्हणजे “एखादा व्यक्ती जो जागृत झाला आहे“अशी जागृती आपणा सर्वांमध्ये येवो ही सदिच्छा.

टीप:- 

1. या गोष्टीचे लेखक मला माहित नाहीत, त्या अज्ञात लेखकाचे धन्यवाद.🙏🏻.

2. या गोष्टीच्या शेवटी @ पासून थोडासा बदल माझ्या मनाने केलेला आहे 🎷.

3. जेव्हा जेव्हा मी ही गोष्ट मनामध्ये आणतो तेव्हा तेव्हा मला नवनवीन काहीतरी शिकत आहे असे वाटते. आपणासही या गोष्टीतून भरपूर काही शिकण्यास मिळून ही सदिच्छा.🙏